Raiagad Corona : …आत्ताच काळजी घेण्याची खरी गरज, विजयभाऊ पाटील यांचे आवाहन

पेण : रायगड जिल्ह्यात कोरोनाची स्थिती अजूनही बिकट आहे. यासाठी आपल्यामध्ये खूप बदल करावा लागणार आहे….आताची परिस्थिती पाहता जर आपण आपल्या वागण्यामध्ये बदल केला नाही, तर स्थिती खुप गंभीर असू शकते. आत्ताच काळजी घेण्याची खरी गरज आहे, असे कळकळीचे आवाहन रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर संघ, पेण-रायगडचे संस्थापक अध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

विजयभाऊ पाटील यांनी म्हटले की, ऑगस्टपर्यंत आपल्या कुठल्या मित्राला नातलगाला कोरोना झाल्याची बातमी कानावर येत नव्हती, पण आता वेळ बदलली आहे. आपले जवळचे नातलग मित्रमंडळी सुद्धा कोरोना पॉझिटिव सापडत आहेत. आता भीती कोरोनाची नाही…तर भीती आहे वेळेवर उपचार न मिळण्याची…आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती खूप बिकट आहे. ऑक्सीजन व व्हेंटिलेटर बेड सहजासहजी उपलब्ध होत नसल्याचे वास्तव नाकारून चालणार नाही.

होम आयसोलेशन हाच पर्याय आता सर्वांच्या जवळ आहे. कोरोना झाल्यावर होम आयसोलेशन करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी आत्ताच सर्वांनी काळजी घेणे हाच एकमेव पर्याय आहे. शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे हाच एकमेव मार्ग आहे.

कोणी आपल्या कितीही जवळचा जरी असला तरी त्यांच्या शुभकार्याला न जाणे हेच शहाण्या माणसाचे लक्षण सध्याच्या स्थितीत आहे. गरज असेल तरच बाहेर पडा. तुमच्यावर तुमचं पूर्ण कुटुंब अवलंबून आहे. तुम्हाला काही कमी जास्त झालं तर तुम्ही विचार करा, तुमच्या कुटुंबाचे काय होईल.

कुटुंबाला व तुमच्या आयुष्याला प्रथम महत्त्व द्या. पैसे ही माणसाची शेवटची गरज आहे. आज लोकांच्याकडे खूप पैसे असूनसुद्धा लोक उपचाराविना स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला वाचवू शकत नाही. माझी सर्वांना नम्रतेची विनंती आहे की स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.