Raigad : भाजपा जिल्हाध्यक्षांचा पाहणी दौरा संतप्त शेतकर्‍यांनी उधळला, गडब येथील प्रकार

नागोठणे (महेश पवार) : गडब, माचेला,खारपाले,जुई-अब्बास येथील शेतकऱ्यांच्या जमिनी समुद्राचे खारे पाणी घुसून उध्वस्त झाल्या होत्या. म्हणून जेएसडब्ल्यू कंपनी येथे खार बांध बंदिस्तीचे काम खारलँड विभागाच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. मात्र भाजप रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी जेएसडब्ल्यू कंपनी च्या मालकांविरोधात कारवाई होण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार अर्ज देऊन हे काम थांबविण्याकामी पुढाकार घेऊन स्थळ पाहणी नुकतीच आयोजित केली होती. ही बाब स्थानिक शेतकऱ्यांना समजल्यावर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. आणि  अॅड.मोहिते यांनी आयोजित केलेली स्थळ पाहणी उधळून लावण्यात आली.

या बाबतीत सविस्तर माहिती अशी की सन २०१४ पासून गडब, माचेला,खारपाले,जुई अब्बास येथील शेतकऱ्यांच्या जमिनी समुद्राचे खारे पाणी घुसून उध्वस्त झाल्या होत्या व त्यासंदर्भात येथील स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ हे शासनदरबारी आई अकादेवी प्रकल्पग्रस्त शेतकरी, सामाजिक विकास संस्था व अरुण शिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करीत होते. परंतु ज्या खारलँड डिपार्टमेंट ची सदरील बांधाची कामे करण्याची जबाबदारी असताना कोणत्याही प्रकारचा निधी नसल्यामुळे एकूण पाच ते सात हजार एकर जमिनी उध्वस्त होण्याच्या मार्गांवर असताना खा. सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाने विधिमंडळ पावसाळी अधिवेशन नागपूर २०१८ मध्ये आमदार अनिकेत तटकरे यांनी सदर प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव करून दिली. त्यावर सभापतींनी त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच याच विषयी व नुकसान भरपाई संदर्भात ना. धनंजय मुंढे, आ. अनिकेत तटकरे, जगन्नाथ शिंदे, माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी मुंबई अधिवेशन येथे उपस्थित करून त्वरित निर्णय घेण्यास भाग पाडले. परंतु खारभूमी विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून दुर्लक्ष केले जातं होते. खासदार सुनिल तटकरे व पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली १३ फेब्रुवारी २०२० रोजी मंत्रालयात बैठक झाली. सदर बैठकीत खारभूमी वरिष्ठ अधिकारी, जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी, कराव सरपंच अरुण शिवकर उपस्थित होते.

खारभूमी विभागाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे जेएसडब्ल्यू स्टील कंपनी ने सीएसआर फंड वापरून करण्याचे ठरून सदरील बांधाच्या दुरुस्तीचे काम खारलँड विभागाच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली हाती घेतले होते. भर पावसातही येथील काम चालू होते आणि माचेला चिर्बी येथील खंडीचे काम पूर्ण केले. काम सुरु असतांना किंवा स्थानिक शेतकरी  कामाचा पाठपुरावा गेल्या ५-६ वर्षांपासून करीत असताना अॅड. महेश मोहिते हे कोठेही दिसले नाहीत आणि अचानक  कामामुळे कांदळवणाची नासधूस झाली असे समजून जेएसडब्ल्यू कंपनी च्या मालकांविरोधात कारवाई होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार अर्ज देऊन  काम थांबविण्याकामी पुढाकार घेत असल्याचे सर्व स्थानिक शेतकऱ्यांना समजल्यावर येथील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. आज शासनावर दबाव टाकून आयोजित केलेल्या स्थळ पाहणी उधळून लावण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील, तुळशीदास कोठेकर, परशुराम मोकल, आत्माराम म्हात्रे, मोरेश्वर म्हात्रे, दिगंबर पाटील, लक्ष्मण पाटील, सिताराम चवरकर, मिलिंद पाटील, कमलाकर पाटील, प्रभाकर पाटील, राजू पाटील, सखाराम पाटील, किरण तुरे माजी सरपंच खारपाले,अकरा गाव जमिन बचाव संघर्ष कृती समिती,जुई अब्बास, देवळी,ढोबी, खारपाले, गडब जवळ जवळ ७० ते ८० स्थानिक शेतकरी उस्फुर्तपणे उपस्थित होते आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत अॅड. मोहिते यांना खोटा कळवळा आहे हे जाणवून स्थानिक शेतकरी हा गरीब असेल पण कोणत्याही स्वार्थीपणाला न झुकणारा आहे हे दाखवून दिले व एक संदेश लोकांना दिला की, स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवायला स्थानिक शेतकरी समर्थ आहेत व बाहेरील कोणत्याही व्यक्तीचे स्वार्थी हेतू साध्य होऊ देणार नाहीत. तसेच सर्व शेतकऱ्यांनी जे एस डब्लू प्रशासनाच्या कामाचे कौतुक करत उर्वरित जुई अब्बास पर्यंतचा बांधही जे एस डब्लू कंपनी ने पूर्ण करावा व याकामी सर्व स्थानिक शेतकऱ्यांचा पाठिंबा जे एस डब्लू कंपनी ला आहे हे घोषित केले.