PHOTO : संत बाळूमामा देवस्थानचे संभाव्य सरकारीकरण रहित करून गैरव्यवहारांच्या प्रकरणांची CID चौकशी करा,  मोर्चाद्वारे भक्तांची मागणी

कोल्हापूर : देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानात प्रशासक नेमल्यावरही भाविकांच्या असुविधांमध्ये वाढच झाली आहे. प्रशासक येण्यापूर्वी देवस्थानातील जे विश्‍वस्त दोषी आहेत त्यांच्यावर अद्याप कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही. तरी संत बाळूमामा देवस्थानच्या देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची त्वरित ‘सी.आय.डी.’ चौकशी व्हावी, तसेच संभाव्य सरकारीकरण रहित करून मंदिर भक्तांच्या ताब्यात द्यावे, अशी एकमुखी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ मोर्चाद्वारे करण्यात आली.

‘बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था’, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने आयोजित या मोर्चासाठी 600 हून अधिक भक्तांची उपस्थिती होती. मोर्चाच्या अंती निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय तेली यांनी निवेदन स्वीकारले. हे निवेदन तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे पाठवू, असे आश्‍वासन त्यांनी दिले.
या मोर्चात पिवळा भंडारा लावून, तसेच घंटा आणि ढोल वाजवत भक्तगण सहभागी झाले होते. ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक सुनील सामंत हे संत बाळूमामा यांची वेशभूषा करून मोर्चात सहभागी झाले होते.
या प्रसंगी ‘नाही होऊ देणार, नाही होऊ देणार बाळूमामा देवस्थानचे सरकारीकरण, नाही होऊ देणार’, ‘मशीद आणि मदरसा यांच्यासाठी वक्फ बोर्ड, चर्चसाठी डायोसेशन सोसायटी, तर मग बाळूमामांच्या मंदिराचेच सरकारीकरण का?’, ‘बाळूमामांच्या भक्तांना मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे’, ‘नको शासक नको प्रशासक, भक्तांना हवेत बाळूमामांचे प्रामाणिक सेवक !’ यांसह देण्यात आलेल्या अन्य घोषणांनी दसरा चौक दणाणून गेला.
मोर्चाच्या समारोपप्रसंगी बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्थे’चे अध्यक्ष निखिल मोहिते-कुराडे म्हणाले, ‘संत बाळूमामा देवस्थानमध्ये प्रशासक नेमल्याचे दुष्परिणाम भाविक-भक्त सध्या भोगत आहेत. बाळूमामांच्या बग्यातील ज्या बकर्‍या आजारी पडतात त्यांना पहाण्यासाठी डॉक्टर नाहीत, त्यांना वेळेवर औषधे मिळत नाहीत, अशी स्थिती आहे.
संत बाळूमामांच्या दर्शनासाठी बाहेर गावाहून आलेल्या भाविकांना वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही, भाविकांसाठी प्रसाधनगृह नाही, प्रसादाची गैरसोय होते यांसह अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.’’ उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे म्हणाले, ‘‘मंदिरावर प्रशासक नेमून भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेला पैसा हडप करण्याचे षडयंत्र भक्तगण उधळून लावतील.’’
या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट म्हणाले, ‘‘वर्ष 1966 ला संत बाळूमामा यांचे समाधी मंदिर स्थापन झाले आणि वर्ष 2003 मध्ये पहिल्यांदा विश्‍वस्त मंडळ अस्तित्वात आले. विश्‍वस्त मंडळ विसर्जित करून प्रशासक नेमण्याच्यापूर्वी ज्या भाविकांनी दागिने दान म्हणून दिले त्यांच्या नोंदी नाहीत, तसेच देवस्थाकडे नेम्या किती जमिनी आहेत ? याच्याही नोंदी नाहीत. त्यामुळे ज्या विश्‍वस्तांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांची चौकशी ही झालीच पाहिजे. याच समवेत त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचीही चौकशी झाली पाहिजे.
गेले 3 महिने बकर्‍यांची विक्री बंद आहे; त्यामुळे मंदिराचे जे कोट्यवधी रुपयांचे जे उत्पन्न बुडत आहे त्याला जे उत्तरदायी आहेत त्यांच्यावर कधी कारवाई होणार ? त्यामुळे हे मंदिर प्रामाणिक भक्तांच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी आम्ही करत आहोत.’’ या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे बाबासाहेब भोपळे, गजानन तोडकर, किरण कुलकर्णी, रामभाऊ मेथे, सुनील सावंत यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.

उपस्थित मान्यवर – ‘बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्थे’चे अध्यक्ष निखिल मोहिते-कुराडे, उपाध्यक्ष मानतेश नाईक, दयानंद कोनकेरी, सरदार खाडे, सिद्धार्थ एडके, संजय शेंडे, सागर पाटील, देवदास शिंदे, संत बाळूमामा यांची प्रत्यक्ष सेवा केलेले भक्त चंदूलाल शहा-शेठजी यांचे पणतू परेश शहा-शेठजीबजरंग दलाचे पराग फडणीस आणि अक्षय ओतारी, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे शरद माळी, या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई आणि शहराध्यक्ष गजान तोडकर, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष आनंदराव पवळ, उद्धव ठाकरे गटाचे करवी रतालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, अंबाबाई भक्त समितीचे प्रमोद सावंत, ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक सुनील सामंत, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह सुरेश यादव, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासने, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, यांसह नागाव, शिरोली, भुये, शिये, निगवे, मुदाळ या गावातून धर्मप्रेमी, भक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *