उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चाणजे हद्दीतील डाऊरनगर येथील जिल्हा वार्षिक योजनेतून बांधण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या अंगणवाडी बाबत ग्रुप ग्रामपंचायत चाणजेच्या सदस्या किंजल कैलास भोईर यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण यांच्याकडे पत्रव्यवहार करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.
ग्रुप ग्रामपंचायत चाणजे हद्दीत वार्ड क्र. 3, डाऊर नगर ता. उरण, जि. रायगड येथे जिल्हा वार्षीक योजनेतुन अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले आहे. सदर अंगणवाडीचे बांधकाम हे निकृष्ठ दर्जाचे केले असून सदर कामामध्ये जुने पाईप, जुने पत्रे, जुन्या विटा वापरण्यात आल्या आहेत. तसेच अंगणवाडीचे शौचालयाचे काम केले असून शौचालयाची टाकीचे बांधकाम केलेले नाही. सदर शौचालयाचे पाणी शेजारील असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या टाकीत सोडले आहे. तसेच अंगणवाडीमध्ये अनेक कामे अपुरे ठेवले आहेत.
या बाबतीत किंजल भोईर यांनी ठेकेदार विशाल गावंड रा. पिरकोन, यांना या अपु-या कामाबाबत सांगितले असता त्यांनी या सांगण्याकडे दुर्लक्ष करून अंगणवाडीचे काम आज पर्यंत अपूरे ठेवले आहे. अंगण वाडीचे काम अजून पूर्ण झाले नाही तरी सुध्दा त्यांनी काम पुर्ण झाल्याची फलक सुध्दा लावले असून कामाची रक्कम उचलली आहे.काम अपूर्ण असताना काम झाल्याचे पूर्ण रक्कम काम पूर्ण होण्याच्या अगोदरच कशी दिली जाते असा सवाल किंजल भोईर यांनी पत्रव्यवहाराद्वारे उपस्थित केला आहे.
अंगणवाडीत लहान मुल असतात अंगण वाडीच्या निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे मुलांच्या जिवीतास धोका आहे. तरी सदर कामाची पहाणी करावी व पुढील कामाची रक्कम देऊ नये. तसेच सदर अंगणवाडीचे काम हे निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या सदर ठेकेदारावर कायदेशीर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी चाणजे ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्या किंजल भोईर यांनी पत्रव्यवहाराद्वारे जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी ठिकाणी केली आहे. आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.