उरण : औद्योगिक दृष्टीने प्रगत असलेल्या उरण तालुक्यात प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही प्रलंबीत आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारने ते सोडवून उरणकर जनतेला दिलासा देण्याची मागणी रायगड जिल्हा परिषद सदस्या कुंदाताई वैजनाथ ठाकूर यांनी केली आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदन पाठवून समस्त उरणकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्नाला त्यांनी हात घातला आहे.
औद्यागिकीकरणामूळे उरण तालुक्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. परंतु प्रकल्पांसाठी योगदान देणारा शेतकरी, भुमिपुत्र आजही वंचित आहे. न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. प्रकल्पासाठी अल्प मोबदल्यात जमिनी दिलेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली नाही. तसाच प्रकार धरणासाठी जमिनी दिलेल्या गावकऱ्यांच्या बाबतीत झालेला आहे. उद्योगांना विपुल प्रमाणात पाणी पुरवठा होत असताना स्थानिक जानतेला पिण्यासाठी पाणी नसल्याचे मुद्यावर कुंदाताई ठाकूर यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
उरण तालुक्यातील उद्योगांना पाणी पुरवठ्यासाठी रानसई धरण बांधण्यात आले. धरणासाठी रानसई, दिघोडे, कंठवली गावातील शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी संपादन करण्यात आल्या. त्या शेतकऱ्यांना परिसरातील उद्योगात रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात कुणालाही नोकरी मिळाली नाही. तर काही शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदलाही मिळालेला नाही. परिसरातील गावांना पाणी मिळणे क्रमप्राप्त असून पाणीसाठा वाढविण्यासाठी धरणातील गाळ काढवा, टेकड्या सपाट करणे अवश्यक असल्याचा मुद्दाही निवेदनात नमुद केला आहे.