मुंबई : मुंबईतील २६/११ हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर हूसैनला भारताच्या हवाली करण्याचा निकाल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. लवरकच तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात येईल. तहव्वूर राणा सध्या लॉस एंजल्स येथे तुरूंगात आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेविड हेडलीशी त्याचे संबंध असल्याचा आरोप आहे.
मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या ‘यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर द नाइन्थ सर्किट’ न्यायालयाने प्रत्यार्पण करारानुसार तहव्वूर राणाला भारताच्या स्वाधीन केले जाऊ शकते, असे सांगितले होते. मुंबईवर केलेला दहशतवादी हल्ला योग्यच होता, अशी कबुलीही राणाने दिल्याचे सुनावणी दरम्यान न्यायाधीश मिलान स्मिथ यांनी सांगितले होते. त्यानंतर राणाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. राणाला ही शेवटची संधी होती. याआधी त्याने अमेरिकेच्या विविध न्यायालयांमध्ये केलेले अपील फेटाळले गेले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही त्याची याचिका फेटाळून त्याचे प्रत्यार्पण करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
अटकेनंतर तहव्वूर राणाने कबूल केले की, लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ही एक दहशतवादी संघटना आहे आणि त्याचा बालपणीचा मित्र डेव्हिड हेडली पाकिस्तानमधील त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात गेला होता. अमेरिकन कागदपत्रानुसार, २००५ च्या उत्तरार्धात हेडलीला एलईटीकडून भारतात प्रवास करून तिथे पाळत ठेवण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. २००६ च्या सुरुवातीस हेडलीने एलईटीच्या दोन सदस्यांसह मुंबईत इमिग्रेशन कार्यालय उघडण्याबाबत चर्चा केली. हेडलीने राणाला याची माहिती दिली आणि त्यांनी राणाच्या फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेसचे कार्यालय वापरण्याचा निर्णय घेतला, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
हेडलीच्या साक्षीनुसार तसेच ईमेल आणि इतर कागदपत्रांच्या माहितीनुसार, राणाने फर्स्ट वर्ल्डशी संबंधित व्यक्तीला हेडलीसाठी कागदपत्रे तयार करण्याचे निर्देश दिले आणि हेडलीला भारताच्या प्रवासासाठी व्हिसा कसा मिळवायचा याबद्दल सल्ला दिला. मुंबईवरील हल्ल्यापूर्वी राणाने शिकागोमध्ये इमिग्रेशन लॉ सेंटर चालवणाऱ्या रेमंड सँडर्सच्या माध्यमातून हेडलीला भारतात मल्टिपल-एंट्री बिझनेस व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केली, तसेच आर्थिक सहाय्यही केले. त्याने हेडलीला सप्टेंबर २००६ मध्ये ४१,९३७ रुपये, ऑक्टोबर २००६ मध्ये ६७,६०५ रुपये, नोव्हेंबरमध्ये १७,६३६ रुपये आणि डिसेंबर २००६ मध्ये ८३,८७५ रुपयांचे आर्थिक सहाय्य केले.
मार्च २०१६ मध्ये मुंबईतील विशेष न्यायालयासमोर उलटतपासणीदरम्यान, हेडलीने न्यायालयाला सांगितले की, पाकिस्तानच्या आयएसआयचे मेजर इक्बाल यांच्या सूचनेनुसार हल्ल्यासाठी लोकांची भरती करण्यासाठी म्हणून त्याने भाभा अणु संशोधन केंद्राला भेट दिली होती. राणाला याची माहिती होती. ताजमहाल पॅलेस हॉटेलवरील हल्ल्याच्या तपशिलांचीही राणाला माहिती होती. त्याने हेडलीशी हल्ल्याच्या लक्ष्यांबद्दल सविस्तर चर्चा केली होती. राष्ट्रीय तपास संस्थेला राणा हवा आहे आणि त्याच्यावर गुन्हेगारी कट रचणे, भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे, हत्या, फसवणुकीच्या उद्देशाने खोटी कागदपत्रे तयार करणे आणि इतर गुन्ह्यांचा आरोप आहे.