महाड-पोलादपूरमध्ये स्नेहल जगताप यंदा गोगावलेंना अस्मान दाखवणार का? शेठची वाट का बिकट?, वाचा निवडणूक विश्लेषण

(ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक अजय सोनावणे यांनी महाड-पोलादपूर विधानसभा मतदारसंघातील मुख्य लढतीचे केलेले हे विश्लेषण. सोनावणे यांनी पुणे-मुंबईसह अनेक वर्षे उत्तर आणि दक्षिण रायगडच्या पत्रकारितेत काम केले आहे. रायगड हे त्यांचे होमपीच असल्याने त्यांच्या दृष्टीकोनातून महाड-पोलादपूर विधानसभा निवडणुकीचा अंदाज जाणून घेणे महत्वाचे ठरते. यासाठीच येथे देत आहोत आमच्या वाचकांसाठी हे सविस्तर निवडणूक विश्लेषण.)

महाड-पोलादपूर विधानसभा मतदारसंघातील लढत ही महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप विरूद्ध शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यात थेट होत आहे. गोगावले हे विद्यमान आमदार असले तरी बदलेल्या राजकीय समिकरणांमुळे गोगावले यांची यंदा आमदारकीची वाट सोपी दिसत नाही.

मविआच्या उमेदवार स्नेहल जगताप यांची निशाणी मशाल असून सध्या त्यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार चालवला आहे. महिलाशक्ती आणि युवाशक्तीचा चांगला प्रतिसाद स्नेहल जगताप यांना मिळत असल्याने त्यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरते. स्नेहल जगताप या महाड-पोलदपुरचे दिवंगत नेते माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या सुकन्या आहेत.

वडिलांकडून मिळालेला राजकीय वारसा त्या सचोटीने चालवत आहेत. महाडच्या नगराध्यक्ष म्हणून त्यांचे काम नेहमीच चर्चेचा विषय ठरले. वडिलांच्या अचानक झालेल्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा यशस्वी प्रयत्न स्नेहल यांनी करत सर्वांनाच आधार देण्याचे केलेले काम कौतुकास्पद होते.

पक्षाचे नेते हनुमंतराव जगताप तसेच तालुक्यातील अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महाड-पोलदापुरच्या राजकारणावर मिळवलेली पकड त्यांना आमदारकीच्या लढतीत उपयोगी ठरणार आहे.

महाड-पोलादपूर विधानसभा मतदारसंघात स्नेहल जगताप या सर्वात तरुण उमेदवार असल्याने तरूणाईला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. युवा वर्गाकडून त्यांना मोठा पाठींबा दिसत आहे. शिवाय, महिला उमेदवार असल्याने त्यांना महिलांकडून देखील उत्स्फुर्त असा प्रतिसाद आहे.

महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांचे नेते आणि कार्यकर्ते, स्नेहल जगताप यांच्या विजयासाठी सरसावले असल्याचे या मतदारसंघात दिसत आहे. यामुळे स्नेहल जगताप यांचा आमदारकीवरील दावा मजबूत वाटत आहे.

तर दुसरीकडे येथील विद्यमान आमदार भरत गोगावले यांची ही चौथी टर्म आहे. यावेळी येथील मतदार दिवंगत माणिकराव जगतापांच्या सुकन्येला आमदारकीची संधी देणार की, भरत गोगावलेंना. हे निकालानंतर स्पष्ट होईलच, पण महाड-पोलादपुरमधील बदललेल्या राजकीय समिकरणामुळे यंदा भरत गोगावले यांची वाट सोपी राहिलेली नाही, हे देखील तेवढेच सत्य आहे.

ज्या शिवसेना पक्षातून भरत गोगावले तीनवेळा निवडूण आले होते, त्या पक्षाचेच आता दोन भाग झाले आहेत. याचाच दुसरा अर्थ गोगावले यांची पक्षीय ताकद कमी झाली आहे.

भरत गोगावले हे शिंदेंच्या शिवसेनेचे महाड-पोलादपुरमधील उमेदवार आहेत. मागच्यावेळी गोगावले हे एकसंघ असलेल्या शिवसेनेतून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार म्हणून निवडूण आले होते.

परंतु, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर भरत गोगावले यांनी सुरत-व्हाया-गुवाहाटी या गाजलेल्या राजकीय नाट्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. गोगावले यांचे शिवसेनेतून शिंदे गटात जाणे अनेकांसाठी धक्कादायक होते.

महाड-पोलदापुरमधील जनतेने तेव्हा सुरत आणि गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये गोगावलेंना टीव्हीवर पाहिले तेव्हा त्यांना निश्चितच धक्का बसला होता.

मतदार संघासाठी निधी मिळत नव्हता, अजित पवार निधी देत नव्हते, म्हणून शिवसेनेत बंडखोरी केली, असे कारण त्यावेळी सांगितले गेले. मात्र काही दिवसातच स्वत: अजित पवार देखील शिंदे आणि गोगावलेंसोबत सत्तेत सहभागी झाल्याचे पाहून, महाडकरांचेच डोके चक्रावले होते. या सर्व गोष्टींचा परिणाम या निवडणुकीत होईल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महाड-पोलादपुरमधील ज्या मतदारांनी गोगावले यांना आमदार म्हणून निवडून दिले होते, त्यांना गोगावले यांचे शिवसेनेतून शिंदे गटात जाणे किती पसंत पडले असेल, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मानणारे मतदार यावेळी गोगावलेंना साथ देणार नाहीत, हे तर उघड आहे.

याउलट येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल जगताप असल्याने ठाकरेंना मानणारे नेते, कार्यकर्ते मोठ्या त्वेषाने यावेळी गोगावले यांच्याविरूद्ध लढत असल्याचे दिसत आहे.

भरत गोगावले हे विकासकामांची यादी वाचून दाखवत असले तरी येथील जनतेला चांगले जीवन जगता येत आहे का? त्यांना सर्व सोयी-सुविधा मिळत आहेत का? हा महत्वाचा प्रश्न आहे. येथील जनतेच्या रोजच्या जगण्यात भरत गोगावले यांच्या विकासकामांमुळे काही फरक पडला आहे का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरते.

महाड-पोलादपूर मतदारसंघात अनेक कामे आजही प्रलंबित आहेत. गोगावले यांनी सर्वाधिक निधी महाडसाठी आणला असे शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी मध्यंतरी महाडमधील एका सभेत म्हटले. मग जनतेचे जगणे अद्याप सुसह्य का झालेले नाही, हा खरा प्रश्न आहे. महाडच्या शासकीय रूग्णालयासाठी निधी आणण्यासाठी त्यांना तब्बल पंधरा वर्षे लागली आहेत.

शिवसेनेत शिंदे गटाने फूट पाडल्यानंतर पन्नास खोक्यांचा गंभीर आरोप विरोधीपक्षांनी लावून धरला होता, याचा परिणाम देखील महाड-पोलादपूर विधानसभा निवडणुकीत यंदा होऊ शकतो.

सर्वात महत्वाचे म्हणजे केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे, आणि याच सरकारमध्ये शिंदे गट आहे, केवळ सहभागी नव्हे, तर स्वत: एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करत आहेत. तर दुसरीकडे, वाढती महागाई आणि बेरोजगारीमुळे जनता त्रस्त आहे. त्यातच महाराष्ट्रातील काही उद्योग गुजरातला गेल्याचे दोन-तीन प्रकार घडल्याने युवा वर्गात नाराजीचा सूर आहे. याचाही परिणाम या निवडणुकीत दिसून येऊ शकतो.

आपण निवडूण दिलेला उमेदवार याच गटात अथवा पक्षात राहिल की मागील वेळेसारखा आपल्याला न विचारता अन्य पक्षात जाईल, असा प्रश्न देखील काही मतदारांना या वेळेला पडू शकतो.

अत्यंत महत्वाचा आणि गंभीर मुद्दा म्हणजे, ही विधानसभेची निवडणूक असूनही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात येऊन ज्या प्रकारे ’बटेंगे तो कटेंगे’ आणि ’एक है तो सेफ है’, च्या घोषणा दिल्या, त्याचे संतप्त पडसाद पुरोगामी आणि प्रगत समजल्या जाणार्‍या महाराष्ट्र राज्यात उमटत आहेत. त्याचा प्रतिकुल परिणाम महायुतीच्या उमेदवारांवर होऊ शकतो.

म्हणूनच महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी-योगींच्या या घोषणांवर माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली आहे. काल कोकणातील शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी देखील मोदी-योगींच्या या घोषणांना विरोध करत अल्पसंख्यांक समाजसुद्धा आमचाच असल्याचे म्हटले आहे. याबाबत भरत गोगावले यांचे मत काय आहे, हे जाणून घेणे आवश्यक ठरते.

अशाप्रकारे समाजा-समाजात द्वेष निर्माण करणार्‍या मोदी-योगींच्या घोषणा, शिंदे असोत की अजित पवार यांना निवडणुकीत परवडणार्‍या नाहीत. अशा घोषणांमुळे नेहमीच मिळून-मिसळून राहात असलेल्या अल्पसंख्यांक मतदारांच्या मनात सध्या कोणत्या भावना असतील, याचा अंदाज बांधणे अत्यंत महत्वाचे ठरते.

महाड-पोलादपुर मतदारसंघात मोठ्याप्रमाणात अल्पसंख्यांक मतदार आहेत, हे नाराज मतदार महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांना आपले मत देतील का? ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ या मोदी-योगींनी महाराष्ट्रात येऊन दिलेल्या घोषणांचे कशाप्रकारे गोगावलेंसारखे महायुतीचे उमेदवार समर्थन करणार? हे पाहणे देखील महत्वाचे आहे. यावरच त्यांचे निवडणुकीतील यश-अपयश बर्‍यापैकी अवलंबुन असेल.

गोगावले यांच्यासाठी जमेची एक बाजू म्हणजे, ‘लाडकी बहिण योजना’. या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार महायुती करत आहे. पण, राज्याच्या तिजोरीतील पैशातून सत्ताधारी पक्ष भाऊबीज करत आहेत, हे लोकांचे पैसे आहेत, तसेच आम्ही सुद्धा ही योजना यापुढे सुरू ठेवू, 3000 रूपये देऊ, अशाप्रकारचा प्रचार विरोधी पक्षांनी लावून धरला असल्याने या योजनेचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना होईल असे वाटत नाही, ते निकालानंतर स्पष्ट होईलच. पण, एकुणच या मुद्द्यांचा विचार केल्यास महाड-विधानसभा मतदारसंघात यावेळी परिवर्तन होण्याची शक्यता जास्त आहे.

One thought on “महाड-पोलादपूरमध्ये स्नेहल जगताप यंदा गोगावलेंना अस्मान दाखवणार का? शेठची वाट का बिकट?, वाचा निवडणूक विश्लेषण

  1. खूपच छान विश्लेषण आपण केले आहे. सर्व बाजूनी अनेक मुद्दे यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *