कुपोषित बालकांना सुदृढ बनविणे हाच आमचा उद्देश – रिलायन्स एच आर हेड गौतम मुखर्जी

nagothane-re
नागोठणे (महेंद्र माने) : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागोठणे मण्युफॅक्चरींग डीविझन व एकात्मिक बाल विकास प्रकल्प (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 12 ऑक्टोबर रोजी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात झीरो मिशन कुपोषण मुक्त मोहीम आयोजित करण्यात आली. त्यावेळी रिलायन्स एच आर हेड गौतम मुखर्जी यांनी कुपोषित बालकांना सुदृढ बनविणे हाच आमचा उद्देश असल्याचे सांगितले.
या मोहिमेचा शुभारंभानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना गौतम मुखर्जी यांनी सांगितले की, कुपोषित बालकांना योग्य आहार न मिळाल्याने विविध आजार होतात त्याचा परिणाम आरोग्यावर होत असून त्यासाठी त्यांची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या जेवणामध्ये प्रोटीन युक्त अन्न असणे गरजेचे असून कुपोषित बालक त्यामधून बाहेर काढणे व त्यांना सुदृढ बनविणे हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. डॉ.प्रशांत बरदोलोई यांनी कुपोषित लहान बालकांची तपासणी करणे व त्यांना आहाराबाबत योग्य सल्ला देणे यासाठी आम्ही सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.
डॉ.अंकिता मते–खैरकर यांनी कुपोषित बालकांना पोटभर सकस अन्न न मिळाल्याने त्यांचे वजन कमी व त्यांची प्रतिकार शक्ति कमी होत जाते. त्यासाठी कुपोषित बालकांची नियमित तपासणी करणे, त्याकडे लक्ष देणे व सकस आहाराबाबत महत्वपूर्ण माहिती दिली. रमेश धनावडे यांनी वर्षभरात रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
यामध्ये स्वच्छतागृह बांधणे,त्यांची दुरूस्ती करणे,शाळा व ग्रामपंचायत सुसज्ज करणे,आरोग्य शिबीर घेणे. तसेच प्रत्येक गावांच्या मागणी नुसार सोई सुविधा व विविध सामाजिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असून कंपनीचा समाजाला मदत करणे हा उद्देश असल्याने कंपनीची जनतेबरोबर असलेली बांधिलकी अबाधित असल्याचे धनावडे यांनी सांगितले.
आपल्या सूत्रसंचालनात वर्धा कुलकर्णी यांनी कुपोषित बालकांना त्यामधून बाहेर काढण्यासाठी त्यांची तपासणी व औषधे तसेच वजन वाढीसाठी लागणारा खाऊ हा कंपनीच्या माध्यमातून मोफत देण्यात येणार असून सदरील तपासणी महिन्याच्या दुसर्‍या शुक्रवारी नागोठणे आरोग्य केंद्रात होणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला सरपंच डॉ.मिलिंद धात्रक,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभय ससाणे, रिलायन्स मेडिकल ऑफिसर डॉ.प्रशांत बरदोलोई, पब्लिक रिलेशन ऑफिसर रमेश धनावडे, उपजिल्हा रुग्णालय रोहा वैद्यकीय अधीक्षक डॉ.अंकिता मते–खैरकर, सी एस आरच्या वरदा कुलकर्णी, प्रा.आरोग्य केंद्राचे डॉ.सिरसाट यांच्यासह विभागातील अंगणवाडी व आरोग्य सेविका उपस्थित होते.
या मोहिमेत एकूण 118 कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे.त्या पैकी आज 77 बालकांची मोफत तपासणी करून औषधे व सप्लीमेंट्री फूड त्यांना देण्यात आले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार वर्धा कुलकर्णी यांनी मानले.